Pune News: पुणे (शिक्रापूर) : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. पोलीस दलात भरती होण्याचं स्वप्न घेऊन पुण्यात आलेल्या एका तरुणाचा शिक्रापूर येथे दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे. शिरूर तालुक्यातील शिक्रापूर परिसरात मित्राच्या खोलीत राहणाऱ्या 22 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अनेक तरुणांमध्ये शोककळा पसरली आहे.

विरू संजय काळे (वय 22, रा. मोळाचा ओढा, सैदापूर, ता. जि. सातारा) असे मृत तरुणाचे नाव आहे. विरू हा सातारा जिल्ह्यातील रहिवासी असून पोलीस भरतीच्या तयारीसाठी तो पुण्यात आला होता. शिक्रापूर येथे त्याचा मित्र रणजीत साळुंखे राहत असून त्याच्याकडे विरू काही दिवसांपासून थांबला होता. त्याच खोलीत आदित्य साळेकर हा आणखी एक तरुणही परीक्षेच्या तयारीसाठी राहायला आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून तिघेही एकत्र खोलीत राहत होते. घटनेच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास विरूने अचानक खोलीत दोरीने गळफास घेतल्याचे लक्षात आले. ही बाब समजताच मित्रांनी तातडीने त्याला खाली उतरवून जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती विरूचे वडील विजय रामचंद्र काळे (वय 51, रा. सैदापूर, सातारा) यांनी शिक्रापूर पोलिसांना दिली. त्यांच्या माहितीनुसार शिक्रापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. इतक्या लहान वयात मुलाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिक्रापूर पोलीस सर्व बाबींचा तपास करत असून शवविच्छेदन अहवाल आणि नातेवाईकांच्या जबाबांच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस भरतीसाठी मेहनत घेणाऱ्या तरुणाचा असा अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.







