Pune News: पुणे: पुण्यातील बालेवाडी परिसरातील सिलिकॉन व्हॅली आणि संस्कृती होम सोसायटीतील रहिवाशांनी ममता चौकातील वाईन शॉपविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. या वाईन शॉपमुळे परिसरात मद्यपींचा वावर वाढला असून, त्याचा रहिवाशांच्या सुरक्षिततेवर आणि विशेषतः लहान मुलांच्या भविष्यावर विपरीत परिणाम होत असल्याचा गंभीर आरोप रहिवाशांनी केला आहे. वारंवार तक्रार करूनही तोडगा निघत नसल्याने, आता नागरिकांनी या प्रश्नाचा संबंध थेट मतदानाशी जोडला आहे. आगामी निवडणुकीत जो उमेदवार हे वाईन शॉप हटवण्याचे लेखी आणि स्पष्ट आश्वासन देईल, त्यालाच मतदान करण्याचा एकमुखी निर्णय रहिवाशांनी घेतला आहे.

हेही वाचा- फिरायला नेण्याचं आमिष दाखवलं अन् घात केला! केजमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराने संताप
रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, ममता चौकातील वाईन शॉप हे तीन शाळांच्या सुमारे 150 मीटरच्या परिसरात सुरू आहे. शाळेजवळ दारूची दुकाने असू नयेत, असे स्पष्ट नियम असतानाही हे दुकान सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत अनेक वेळा संबंधित विभागांकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या निषेधासाठी रहिवाशांनी सोसायटीच्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर पोस्टर्स लावले होते. या पोस्टर्समध्ये वाईन शॉप हटवणाऱ्या उमेदवारालाच मतदान केले जाईल, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. रहिवासी अनंत भुकेले पाटील यांनी सांगितले की, वाईन शॉपमुळे परिसरात दारू पिऊन भांडणे, मारामारी आणि गोंधळाचे प्रकार नेहमीच घडत आहेत. संध्याकाळी आणि रात्री उशिरा असामाजिक कृत्यांमध्ये वाढ होते. रस्त्यावर आरडाओरडा, शिवीगाळ आणि उपद्रव यामुळे कुटुंबांसाठी परिसर असुरक्षित बनला आहे.
वाईन शॉपच्या उपस्थितीमुळे मालमत्तेच्या किमतीही घसरल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे. अनेक घरमालकांना आपली घरे भाड्याने देताना अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.






