पुणे: पुणे (Pune News) शहरात एका 6 वर्षांच्या मुलीला गेल्या 8 महिन्यांपासून तीव्र खोकल्याचा त्रास होत होता. अनेक उपचार करूनही तिला आराम मिळत नव्हता. पुण्यातील एका हॉस्पिटलमध्ये या गुंतागुंतीच्या केसचा उलगडा झाला असून यामुळे वैद्यकीय क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे. लहान मुलांच्या आरोग्याबाबत पालक किती अनभिज्ञ असू शकतात याचे हे एक मोठे उदाहरण ठरले आहे.

मुलीला रात्रीच्या वेळी खोकल्याचा प्रचंड त्रास व्हायचा आणि औषधे घेऊनही तिला गुण येत नव्हता. दरम्यान, या समस्येचा छडा एका योगायोगामुळे लागला. जेव्हा मुलीची आई डॉक्टरांशी चर्चा करत होती, तेव्हा तिथे असलेल्या एका नर्सला मुलीच्या आईच्या परफ्युमच्या तीव्र सुगंधामुळे अचानक खोकला आला. ही बाब डॉक्टरच्या लक्षात आली आणि त्यांनी आईला काही दिवस सुगंधी द्रव्ये न वापरण्याचा सल्ला दिला.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आईने परफ्युम वापरणे बंद केल्यानंतर केवळ 15 दिवसांत मुलीचा 8 महिन्यांपासूनचा जुना खोकला पूर्णपणे बरा झाला. तीव्र सुगंधामुळे मुलीच्या श्वसनमार्गाला अॅलर्जी झाली होती, ज्यामुळे तिला सतत खोकला येत होता. अनेकदा आपण बाह्य कारणांचा शोध घेतो, पण घरामध्ये वापरल्या जाणाऱ्या रोजच्या वस्तूच आजाराचे कारण ठरू शकतात हे या निमित्ताने सिद्ध झाले आहे.







