Pune News: पुणे : पुण्यातील शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गावर धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवार पेठ परिसरात सुरू असलेल्या बांधकामासाठी करण्यात आलेल्या बोअरवेल खोदकामामुळे मेट्रोच्या बोगद्याला छिद्र पडल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी घरमालक आणि कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 14 मार्च रोजी शिवाजी रोड परिसरातील एका जुन्या वाड्याच्या जागेवर नवीन बांधकाम सुरू होते. या ठिकाणी बोअरवेल खोदकाम करताना ड्रिल थेट मेट्रोच्या बोगद्यापर्यंत पोहोचले. यामुळे बोगद्याच्या काँक्रीट अस्तराला सुमारे 6 इंचाचे छिद्र पडले. या छिद्रातून पाणी झिरपू लागल्याचे मेट्रो कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले.
तांत्रिक पथकाने तपासणी केल्यानंतर ही बाब स्पष्ट झाली. स्वारगेट आणि मंडई स्थानकांदरम्यान हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. मेट्रो प्रशासनाने तातडीने कारवाई करत छिद्र सिमेंट काँक्रीटने बुजवले आणि गळती रोखण्यात यश मिळवले.
मेट्रो मार्गिकेच्या परिसरात कोणतेही खोदकाम करण्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक असते. मात्र संबंधितांनी परवानगी न घेता खोदकाम केल्यामुळे ही घटना घडली. या प्रकारात सुमारे 2.5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अशा अनधिकृत कामांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे.







