पुणे: पुण्यातील शिवाजीनगर ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो मार्गाच्या (Pune Metro) सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवार पेठ परिसरात एका खाजगी इमारतीसाठी बोरवेल खोदताना ते थेट मेट्रोच्या बोगद्यात घुसल्याचे उघड झाले. या निष्काळजीपणामुळे बोगद्याच्या सिमेंट रिंगला सुमारे 6 इंचाचे भगदाड पडले आणि बोगद्यात पाण्याची गळती सुरू झाली. (Latest Marathi News)

ही घटना 14 मार्च रोजी घडली. मेट्रोच्या नियंत्रण कक्षात अचानक ‘वॉटर अलर्ट’ दिसू लागल्याने अधिकाऱ्यांची तातडीने हालचाल सुरू झाली. तांत्रिक पथकाने तपासणी केली असता, शुक्रवार पेठेतील एका खाजगी जागेत परवानगीशिवाय बोरवेलचे काम सुरू असल्याचे आढळले. विशेष म्हणजे, बोरवेलचे टोक थेट खाली असलेल्या मेट्रो बोगद्याला छेदून आत शिरले होते.
या घटनेमुळे केवळ संरचनात्मक नुकसान झाले नाही, तर प्रवाशांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होऊ शकला असता. बोगद्यात पाणी झिरपल्याने विजेच्या तारा, सिग्नल यंत्रणा आणि रुळांवर परिणाम होण्याची शक्यता होती. मात्र, मेट्रो प्रशासनाने तातडीने कारवाई करत विशेष केमिकल आणि काँक्रीटच्या साहाय्याने हे भगदाड बुजवले आणि संभाव्य धोका टाळला.
शिवाजीनगर–स्वारगेट हा मेट्रो मार्ग पुण्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि गजबजलेला प्रकल्प मानला जातो. हा मार्ग जमिनीखाली खोल असल्याने वरच्या भागात कोणतेही खोदकाम करताना मेट्रो प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. तरीही नियम धाब्यावर बसवून करण्यात आलेल्या या बेकायदेशीर कामामुळे मोठा अपघात टळला, असेच म्हणावे लागेल.
या प्रकरणी संबंधित जागामालक आणि कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, शहरात सुरू असलेल्या अशा अनधिकृत कामांवर नियंत्रण ठेवण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. नागरी विकास आणि पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये समन्वयाचा अभाव किती धोकादायक ठरू शकतो, याचे हे ठळक उदाहरण ठरले आहे.






