पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातील अंतर्गत (Rohit Pawar) घडामोडींवरून आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांनी राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना (Sunetra Pawar) त्यांनी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी सत्तेचे केंद्रीकरण करण्यासाठी घाईघाईत आणि संशयास्पद हालचाली केल्याचा दावा केला. (Maharashtra Politics)

रोहित पवार यांच्या मते, अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या 18 दिवसांत, म्हणजे 16 फेब्रुवारी 2026 रोजी प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी निवडणूक आयोगाला पत्र देत पक्षाच्या संविधानात बदल झाल्याचे कळवले. या पत्रात राष्ट्रीय अध्यक्ष नसल्यास सर्व अधिकार कार्याध्यक्षांकडे असतील, अशी तरतूद नमूद करण्यात आली होती. त्या वेळी कार्याध्यक्ष पदावर प्रफुल पटेल होते, त्यामुळे पक्षाचे सर्व निर्णय त्यांच्या हातात जाण्याचा मार्ग मोकळा झाला असता, असा आरोप रोहित पवार यांनी केला.
या प्रक्रियेत सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांना विश्वासात घेण्यात आले नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट केले. सुनेत्रा पवार यांना या हालचालीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून 28 जानेवारी ते स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष होईपर्यंतचा कोणताही पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये, अशी विनंती केल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. यावरून पक्षातील अधिकार हस्तांतरणावरून गंभीर मतभेद असल्याचे स्पष्ट होते.
रोहित पवार यांनी पुढे आरोप करत सांगितले की, पक्षाचा ताबा विशिष्ट गटाकडे ठेवण्याचा आधीपासूनच प्रयत्न सुरू होता. काही नेत्यांनी आणि बाहेरील राजकीय दबावामुळे काही महत्त्वाच्या घडामोडी दडपल्या गेल्याचाही त्यांनी दावा केला. विशेषतः जय पवार यांची नियोजित पत्रकार परिषदही दबावामुळे रद्द झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.







