पुणे: पुण्यातील बिबवेवाडी परिसरात ग्राहकांवरून (Pune Crime) निर्माण झालेल्या वादातून एका तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पूर्वीच्या सलूनमधील ग्राहक आपल्या नव्या दुकानाकडे वळवत असल्याच्या संशयातून सलून मालकाने साथीदारांसह हल्ला केल्याचा आरोप असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. (Latest Marathi News)

मोहमद शमी फिरोज कुरेशी (वय 25) असे मृत तरुणाचे नाव आहे. सौरभ रोहिदास चोरघे (वय 22), अनिकेत सतिश चर्हाटे (वय 27) आणि रोहित संतोष भालशंकर (वय 24) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी शमीचा लहान भाऊ सलमान कुरेशी (वय 18) यांनी तक्रार दिली आहे.
शमी हा मूळ उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील असून कात्रजमधील ‘ट्विस्टर सिझर मेन्स सलून’मध्ये 2 वर्षे काम करत होता. 26 जानेवारी 2026 रोजी त्याने नोकरी सोडली. 9 फेब्रुवारीला तो आणि त्याचा भाऊ पुण्यात येऊन बिबवेवाडीतील ‘साई स्मार्ट हेअर सलून’ चालवू लागले. पूर्वीच्या सलूनमधील ग्राहक त्याला ओळखत असल्याने काही जण नव्या दुकानात येऊ लागले.
19 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता सौरभ चोरघे आणि त्याचे दोघे मित्र दुकानात आले. “तू माझे ग्राहक का बोलावतोस?” या प्रश्नावरून वाद वाढला. आरोपानुसार सौरभने शमीला कानाखाली मारली. त्यानंतर दोन्ही बाजूंनी झटापट झाली आणि तिघांनी शमीला खाली पाडून छाती व पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
शमीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. किरकोळ व्यावसायिक स्पर्धा आणि गैरसमजातून एवढे टोकाचे पाऊल उचलले जाणे ही चिंताजनक बाब आहे. बिबवेवाडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.






