Pune Crime :पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी परिसरात एटीएम (ATM) फसवणुकीची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एटीएम कार्ड मशीनमध्ये अडकल्याचा फायदा घेत एका अज्ञात भामट्याने १७ वर्षीय मुलाची फसवणूक करून त्याच्या कुटुंबाच्या बँक खात्यातून २५ हजार ९०० रुपये काढून घेतल्याचे समोर आले आहे. ही घटना मोशी टोलनाक्याजवळील एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, चिंबळीगाव परिसरात राहणारा एक १७ वर्षीय मुलगा बुधवारी रात्री पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेला होता. पैसे काढत असताना तांत्रिक बिघाडामुळे त्याचे एटीएम कार्ड मशीनमध्ये अडकले. अचानक कार्ड अडकल्याने मुलगा गोंधळून गेला. त्याच वेळी एटीएममध्ये उपस्थित असलेल्या एका अज्ञात व्यक्तीने स्वतःला बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगून मुलाशी संवाद साधला.
त्या व्यक्तीने मुलाला घाबरू नकोस असे सांगत जवळच्या एटीएममधील सुरक्षा रक्षक कार्ड काढून देतील, असे सांगून त्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर भामट्याने मोठ्या चलाखीने मुलाला पुन्हा मशीनवर पिन नंबर टाकण्यास सांगितले. मुलाने पिन नंबर टाकताच त्या व्यक्तीने तो पाहिला. काही वेळातच हातचलाखी करून त्याने मुलाच्या आईच्या बँक खात्यातून परस्पर पैसे काढून घेतले.
काही वेळाने खात्यातील पैसे कमी झाल्याचे लक्षात येताच आपली फसवणूक झाल्याचे मुलाच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने तातडीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. अल्पवयीन मुलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.
सध्या पोलीस एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. एटीएममध्ये कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये, पिन नंबर कुणालाही सांगू नये किंवा त्यांच्या समोर टाकू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.







