Pune Crime :पुणे : पुणे (Pune) ग्रामीण पोलिसांनी अमली पदार्थांच्या विरोधात सुरू केलेल्या कारवाईत मोठे यश मिळवले आहे. दौंड तालुक्यातील खामगाव येथे यवत पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 4 लाख 87 हजार 900 रुपये किमतीचा 8 किलोहून अधिक गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव परिसरातील एका पाण्याच्या टाकीजवळील पत्र्याच्या शेडमध्ये गांजाची साठवणूक करून विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे 27 मार्च रोजी यवत पोलीस आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने संयुक्तपणे या ठिकाणी छापा टाकला. छाप्यात मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला.
या कारवाईत पोलिसांनी आकाश मोहिते (वय 23, रा. खामगाव) याला घटनास्थळीच ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने हा गांजा त्याचा साथीदार सागर चव्हाण याचा असल्याची माहिती दिली. त्याच्या सांगण्यावरूनच तो विक्रीसाठी ठेवण्यात आला होता, असेही त्याने कबूल केले. यानंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सागर चव्हाण सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आकाश मोहिते याला न्यायालयाने 31 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक विजय कोल्हे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख आणि त्यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे परिसरातील अवैध धंद्यांवर आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. भविष्यातही अशा प्रकारच्या कारवाया सुरू राहतील, असा इशाराही देण्यात आला आहे.







