Pune Crime : पुणे : शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या पुणे शहरात अलिकडच्या काळात गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत. विशेषतः तरुणांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी शस्त्रांचा वापर करून वाढदिवस (Birthday Celebration) साजरा करण्याचे प्रकार समोर येत आहेत. अशाच एका घटनेत वानवडी परिसरात काही तरुणांनी भररस्त्यात तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना हडपसर येथील शेवकर वस्ती परिसरात 17 फेब्रुवारी रोजी घडली. काही तरुणांनी सार्वजनिक ठिकाणी तलवार हातात घेऊन केक कापला आणि हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रित करण्यात आला. नंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर झाला. ही बाब लक्षात येताच वानवडी पोलीस ठाण्यातील कर्मचारी अमोल गायकवाड यांनी या प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला.
पोलिसांनी परिसरात जाऊन चौकशी केली असता, संबंधित तरुणांनी तलवारीचा वापर करून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केल्याचे समोर आले. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे शस्त्रांचे प्रदर्शन करणे हा गंभीर गुन्हा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणी संबंधित तरुणांविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यानुसार आणि शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पुणे शहरात अलिकडच्या काळात तलवार किंवा कोयत्याने केक कापण्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे पोलिसांनी अशा प्रकारांवर कडक कारवाई करण्याचे धोरण स्वीकारले आहे. वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब जाधव यांनी अशा प्रकारे कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.





