पुणे: महानगर पालिका निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरु असून शहरातील विविध भागांत पोलीस बंदोबस्त तैनात आहे. मात्र, याचा फायदा घेऊन सोनसाखळी चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. बाणेर आणि हडपसर परिसरात दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी ज्येष्ठ महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेल्याच्या दोन घटना घडल्या असून, शहरातील महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. (Pune Crime)

बाणेर परिसरात महापालिकेच्या सावित्री वर्किंग वुमेन्स हॉस्टेलसमोर बुधवारी (7 जानेवारी) सायंकाळी पावणे आठच्या सुमारास ही घटना घडली. बाणेरमध्ये राहणाऱ्या एक 70 वर्षीय ज्येष्ठ महिला पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे 60 हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेली. याप्रकरणी संबंधित महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक रायकर पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, हडपसर परिसरातही अशाच प्रकारची घटना घडली. हडपसर मधील श्री काळूबाई मंदिरासमोर बुधवारी रात्री दहाच्या सुमारास एका ज्येष्ठ महिलेकडील सुमारे 70 हजार रुपयांचे दागिने दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले. महिलेने आरडाओरड केली; मात्र चोरटे भरधाव वेगात पसार झाले. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड पुढील तपास करीत आहेत.
शहरातील चोरीच्या वाढत्या घटनांमुळे आता चोरट्यांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकताच दिला आहे.







