बारामती: बारामती (Baramati News) तालुक्यातील शेळ्या आणि बोकड चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात वडगाव निंबाळकर पोलिसांना मोठे यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी 12 लाख 95 हजार 850 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून यामध्ये 32 शेळ्या आणि बोकडांचा समावेश आहे. पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील अशोक बाबुराव जाधव याला अटक केली असून त्याचे दोन साथीदार सध्या फरार आहेत. पकडण्यात आलेल्या आरोपीवर यापूर्वीही अनेक पोलीस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी चोरट्यांच्या पिकअप वाहनातून तलवारी, कोयते, कटर आणि इतर घातक शस्त्रे जप्त केली आहेत. ही टोळी रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांच्या गोठ्यातील लोखंडी जाळ्या तोडून जनावरांची चोरी करत होते. सदोबाचीवाडी येथील चोरीच्या प्रकरणात तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी अजय होळकर, आर्यन माने आणि बंटी घोडके यांना अटक केली असून त्यांच्याकडून दोन दुचाकी आणि चोरी केलेले बोकड जप्त केले आहेत. न्यायालयाने या आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
वाघळवाडी परिसरातही या टोळीने शेळ्या चोरण्याचा प्रयत्न केला होता, ज्याचा तपास आता अंतिम टप्प्यात आहे. पोलीस हवालदार पोपट नाळे आणि त्यांच्या पथकाने ही महत्त्वाची कारवाई केली असून जप्त केलेल्या शेळ्या संबंधित शेतकऱ्यांना परत करण्यात आल्या आहेत.







