पुणे: पुण्यातील कोंढवा परिसरात 80 वर्षांच्या वृद्धाची (Pune Crime) जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे बळकावल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. कुलमुखत्यार पत्र (पॉवर ऑफ अटर्नी) दिलेले नसतानाही बनावट व्यक्ती उभी करून खोट्या सह्या केल्याचा आरोप असून, या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

हरिभाऊ नारायण कापरे (वय 80, रा. नेवासा, जि. अहिल्यानगर) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, कोंढव्यातील टिळेकर नगर परिसरातील सर्व्हे नं. 80/3/14 येथील जमिनीच्या व्यवहारात 1990 ते 2020 या कालावधीत फसवणूक करण्यात आली. ही जमीन त्यांच्या आजोबा गोविंद टिळेकर यांच्या नावावर होती आणि त्यांच्या निधनानंतर ती आजी सोनाबाई टिळेकर यांच्या नावावर नोंद झाली होती.
तक्रारीनुसार, या जमिनीतील काही हिस्सा सरोज छाजेड आणि सुमित्रा मेहता यांनी खोटे दस्तऐवज तयार करून आपल्या नावावर करून घेतला. त्यांनी संबंधित कुटुंबीयांनी कुलमुखत्यार पत्र दिल्याचा बनाव करत बनावट व्यक्ती उभी केली आणि खोट्या सह्यांच्या आधारे खरेदीखत नोंदवले, असा आरोप आहे. तसेच 1 गुंठा जमीन सुभाष दुगड यांनीही अशाच प्रकारे बनावट कागदपत्रांद्वारे आपल्या नावावर केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणात विनोद दुगड, निलेश तोष्णीवाल, वंदना राठोड आणि मालव शाह यांचाही सहभाग असल्याचा संशय असून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही फसवणूक नियोजनपूर्वक आणि दीर्घ काळात टप्प्याटप्प्याने केल्याचे दिसून येत आहे.
जमिनीच्या वाढत्या किंमतींच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या बनावट व्यवहारांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणताही व्यवहार करताना कागदपत्रांची सखोल पडताळणी करणे अत्यावश्यक ठरत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक थोरात करत असून, आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.






