Pune Accident : लोणावळा : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील (Mumbai Pune Express) खंडाळा घाटात शुक्रवारी सकाळी एक अपघात (Accident) घडला. अमृत अंजन पुलाजवळील तीव्र उतार आणि वळणावर मासे वाहतूक करणाऱ्या कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर रस्त्यावर उलटला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र चालक आणि त्याचा सहायक किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात सकाळी सुमारे 6.30 वाजण्याच्या सुमारास घडला.

अपघातामुळे काही काळ मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र बोरघाट दस्तुरी महामार्ग पोलिस आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त कंटेनर बाजूला करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्यात आले आणि सुमारे अर्ध्या तासात वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेश येथून मुंबईकडे मासे घेऊन जाणारा कंटेनर (क्रमांक AP-16/TF-3379) अमृत अंजन पुलाजवळील उतारावर येत असताना त्याचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर रस्त्यावर उलटला. या अपघातात चालक आणि त्याचा सहायक किरकोळ जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी पाठवण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच बोरघाट दस्तुरी महामार्गाचे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल पाटील यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. आयआरबी पेट्रोलिंग, महामार्ग वाहतूक पोलीस, डेल्टा फोर्स महाराष्ट्र सुरक्षा बल तसेच मृत्युंजय देवदूत आपत्कालीन पथकाच्या मदतीने क्रेनच्या सहाय्याने कंटेनर रस्त्याच्या बाजूला करण्यात आला.
दरम्यान, कंटेनरमधून गळती झालेल्या ऑईलवर माती टाकून ते पाण्याने स्वच्छ करण्यात आले. त्यामुळे रस्ता पुन्हा सुरक्षित करून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ वलवण एक्झिट येथून जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वळवण्यात आली होती.







