पुणे: आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी आघाडी निश्चित झाल्यानंतर संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी उमेदवारांची यादी जाहीर न करता सावध भूमिका घेतली आहे. निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांना थेट क्षेत्रीय कार्यालयातच अर्ज व ‘एबी फॉर्म’ देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. (PMC Election)

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांची महापालिका निवडणुकीसाठी आघाडी होणार असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. याची माहिती कार्यकर्त्यांना रविवारी देण्यात आली होती. त्यामुळे सोमवारी (ता. 29) उमेदवारांची यादी जाहीर होऊन ‘एबी फॉर्म’ वितरित होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, दुपारपर्यंत यादी जाहीर न झाल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये घालमेल सुरु होती.
दरम्यान, स्थानिक नेत्यांकडून संभाव्य उमेदवारांना अर्जासह सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांची यादी जाहीर न करता क्षेत्रीय कार्यालयातच उमेदवारांना पक्षाचा ‘एबी फॉर्म’ देण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सोमवारी चर्चा झाली. या चर्चेत जागावाटप तसेच निवडणूक कोणत्या पक्षाच्या चिन्हावर लढवायची, याबाबत सविस्तर विचारविनिमय झाल्याचे समजते.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर उमेदवारी न मिळालेल्या काही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटात प्रवेश केला. भाजपचे माजी नगरसेवक शंकर पवार, धनंजय जाधव, नीता मंजाळकर, काँग्रेसचे माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, मनसेचे जयराज लांडगे आणि काँग्रेसचे शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील नेते दत्ता बहिरट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला आहे.







