पुणे: पुणे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची बुधवारी(ता. 31) अत्यंत चुरशीच्या वातावरणात छाननी करण्यात आली. यावेळी पुणे महानगर पालिकेच्या 165 सदस्यांच्या निवडणुकीसाठी 3179 उमेदवार पात्र ठरले आहेत. राज्यात ही पात्र उमेदवारांची संख्या सर्वात जास्त आहे. तर पात्र उमेदवारांच्या बाबतीत पुण्यानंतर ब्रह्रमुंबई महानगर पालिकेचा दुसरा नंबर लागतो. येथे 227 जागांसाठी 2516 उमेदवार पात्र ठरल्याचे समोर आले आहे.

पुण्यात महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सकाळी सुरू झालेली ही प्रक्रिया विरोधी उमेदवारांनी घेतलेले आक्षेपामुळे सुनावणी बुधवारी (ता.31) रात्री उशिरापर्यंत सुरू होती. एकूण 3059 अर्जांपैकी 174 अर्ज विविध तांत्रिक कारणांमुळे बाद ठरवण्यात आले असून, 2703 उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याचे समोर आले आहे. तर राज्याचं आयटी हब म्हणून पुढे आलेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत 128 जागांसाठी 1993 उमेदवार पात्र ठरल्याची माहिती मिळत आहे. यामुळे आता खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या रणांगणाचा पारा चढलेला दिसून येत आहे.
पुणे महानगरपालिकेच्या 41 प्रभागांमधील 165 जागांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यंदा चार सदस्यांच्या प्रभाग पद्धतीमुळे इच्छुक उमेदवारांची संख्या वाढली आहे. प्रभागातील प्रत्येक जागेसाठी साधारणतः 10 ते 12 उमेदवारांनी नशीब अजमावले असून, यात राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसह अपक्षांचाही मोठा भरणा आहे. 5 ते 6 प्रभागांमध्ये उमेदवारांनी एकमेकांच्या अर्जांवर गंभीर स्वरूपाचे आक्षेप घेतल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना अर्जाच्या पडताळणीस वेळ लागला.
अर्ज छाननीदरम्यान प्रामुख्याने जातीचे दाखले अवैध असणे, प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती देणे, विवाह प्रमाणपत्रातील त्रुटी, महापालिकेचा मिळकतकर थकीत असणे आणि ना-हरकत प्रमाणपत्र जोडलेले नसणे, अशा मुद्द्यांवरून हरकत नोंदवण्यात आली होती. अनेक ठिकाणी यावरून उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वादावादी घडून आली. बावधन-भुसारी कॉलनी,येरवडा-कळस-धानोरी, औंध-बाणेर आणि वानवडी या प्रभागांमध्ये उमेदवारी अर्जावर आक्षेप कमी होते. यामुळे येथील निकाल लवकर जाहीर करण्यात आले. मात्र, उर्वरित ठिकाणी रात्री उशिरापर्यंत उमेदवार अर्जाच्या निकालाच्या प्रतीक्षेत होते.
अनेक प्रस्थापित नेत्यांच्या उमेदवारीवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. प्रभाग 36 मधून निवडणूक लढविणारे माजी सभागृहनेते सुभाष जगताप यांच्या अर्जावरही आक्षेप घेण्यात आला होता. तो फेटाळण्यात आला. तसेच प्रभाग 7 (गोखलेनगर-वाकडेवाडी) मध्ये भाजपच्या उमेदवार रेश्मा अनिल भोसले यांच्यावर मालमत्ता कराची थकबाकी असल्याचा आक्षेप आम आदमी पार्टीच्या उमेदवाराने घेतला होता, मात्र सुनावणीअंती त्यांचा अर्ज वैध ठरला. तसेच प्रभाग 2 मधील राष्ट्रवादीच्या उमेदवार नंदिनी सिद्धार्थ धेंडे आणि काँग्रेसचे अविनाश बागवे यांच्या अर्जांवरील हरकतीही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावल्या.
छाननी प्रक्रियेत सर्वाधिक चर्चा रंगली ती शिवसेना (ठाकरे गट) आणि भाजपमधील वादाची. शिवसेना उमेदवारांनी अर्जासोबत केवळ ‘बी’ फॉर्म जोडला असून ‘ए’ फॉर्म जोडलेला नाही, असा आक्षेप भाजपने विविध क्षेत्रीय कार्यालयांत घेतला. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे आपल्या उमेदवारांना हे अर्ज बाद करण्यासाठी दबाव निर्माण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, शिवसेनेने ‘ए’ फॉर्म यापूर्वीच निवडणूक उपायुक्तांकडे जमा केल्याचे पुरावे सादर केल्यानंतर भाजपचे सर्व आक्षेप फेटाळण्यात आले.
या प्रक्रियेनंतर आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, त्यानंतरच प्रत्येक प्रभागातील लढतींचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.







