Sport News : टीम इंडिया 2026 ची सुरुवात थेट एकदिवसीय मालिकेने करणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका 11 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ कधी जाहीर होणार, याचीही माहिती आता समोर आली आहे. (Sport News)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्मा आणि विराट कोहली संघात असणार असून भारतीय वनडे संघाची घोषणा लवकरच केली जाणार आहे. बीसीसीआयच्या एका सूत्रानं सांगितलं की अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती 3 जानेवारी रोजी बैठक घेणार असून, त्याच दिवशी भारताचा एकदिवसीय संघ जाहीर केला जाईल.
टीम इंडियानं शेवटचा वनडे सामना 6 डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणममध्ये खेळला होता. जवळपास महिन्याभराच्या विश्रांतीनंतर भारतीय संघ पुन्हा मैदानात उतरणार आहे. या मालिकेत शुभमन गिल कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत के. एल. राहुलनं संघाचं नेतृत्व केलं होतं.
रोहित शर्माबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं शेवटच्या वनडे सामन्यात 75 धावांची खेळी केली होती. त्यानंतर विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात 155 धावांची तडाखेबंद खेळी करत त्यानं आपला फॉर्म दाखवून दिला. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धही रोहित मोठी खेळी करेल, अशी अपेक्षा आहे.
दुसरीकडे विराट कोहलीही जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत त्यानं दोन शतकं ठोकली, तर विजय हजारे ट्रॉफीत 131 आणि 77 धावा केल्या. रोहित आणि विराट दोघेही आता 2027 च्या विश्वचषकासाठी पूर्णपणे फिट आणि तयार असल्याचं चित्र आहे.
या वनडे मालिकेसाठी संघात जागा मिळवण्यासाठी अनेक खेळाडूंची चुरस पाहायला मिळणार आहे. वनडे मालिकेनंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. टी-20 साठी भारतीय संघ आधीच जाहीर झाला असून त्या संघात शुभमन गिलला संधी मिळालेली नाही. न्यूझीलंडविरुद्ध जाहीर झालेला हाच टी-20 संघ पुढे टी-20 विश्वचषकातही खेळताना दिसणार असल्याचं सांगितलं जात आहे.







