संतोष मुंडे

पुणे: एकीकडे पुणे शहरात गुन्हेगारी वाढत असल्याची नागरिकांमध्ये तीव्र भावना आहे, तर दुसरीकडे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना उमेदवारी देत असल्याचा आरोप-प्रत्यारोपांचा फड रंगताना दिसत आहे. “दुसऱ्या पक्षाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली म्हणून आम्हीही दिली” असा युक्तिवाद राज्यात काही नेत्यांकडून केला जात आहे. यामुळे पुण्यात राजकारण आणि गुन्हेगारी यांचे साटेलोटे असल्याची चर्चा पुणेकरांमध्ये होत असल्याचे दिसून आहे. (PMC Election)
या मुद्द्यावरून राजकारण तापले असून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांच्यात जोरदार शाब्दिक संघर्ष सुरू झाला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजपची थेट आमने-सामने ठाकले आहेत. यामुळे महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत टीकेची धार अधिक तीव्र झाली आहे.
अलीकडेच पुण्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना उमेदवारी दिल्याचा आरोप करत भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर निशाणा साधला होता. यावेळी भाजपने हत्येचे आरोप असलेल्या रोहिदास चोरघे यांच्या पत्नी प्रतिभा चोरघे यांना उमेदवारी दिली आहे. ही उमेदवारी त्यांना का दिली? असा सवाल उपस्थित झाल्यानंतर मोहोळ यांनी पलटवार करत अजित पवारांकडे बोट दाखवले.
मंत्री मोहळ म्हणाले, “एकीकडे पालकमंत्री पुणे गुन्हेगारीमुक्त होण्याची भाषा करतात, तर दुसरीकडे शहराच्या पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत विविध भागात त्यांच्या (अजित पवारांच्या) उमेदवारांची यादी पाहिली तर ते कोणत्या तत्त्वात बसते?” असा सवाल मोहोळ यांनी उपस्थित केला. तसेच गुंड आंदेकरांच्या घरात उमेदवारी दिल्याचा उल्लेख करत त्यांनी अजित पवारांवर निशाना साधला.
या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले “अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली यांनी रस्त्यांची सगळी वाट लावली आहे. शहरातल्या अनेक रस्त्यांवर अतिक्रमण झाले असून तिथे हफ्तेखोरी सर्रास सुरू आहे. गेल्या नऊ वर्षांच्या भाजपच्या सत्ताकाळात असा विकास झाला आहे का?” असा सवाल करत त्यांनी थेट आरोप केले. तसेच ते म्हणाले “टेंडरमध्ये टक्केवारी केली जाते, दादागिरी होते. मी पुरावे देतो, पुराव्यांशिवाय मी असं बोलणार नाही,” असे म्हणत पवारांनी भाजपवर गंभीर आरोप केले.
एवढंच नाही तर अजित पवारांनी शहरातल्या एका व्यक्तीला विदेशात पळून जाण्यासाठी कोणी मदत केली, पासपोर्ट कोणी मिळवून दिला आणि तो कसा पळून गेला, याची चौकशी करण्याची मागणी केली. पवारांनी नाव न घेता निलेश घायवळ प्रकरणाचा उल्लेख केला. “भाजपने गेल्या काही वर्षांत कोणाकोणाला कशी उमेदवारी दिली, याचीही माहिती काढा,” असे ते म्हणाले.
दरम्यान, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या मुलावर गुन्हे दाखल असल्याच्या काँग्रेसच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, “गुन्हे दाखल असणे म्हणजे दोषी ठरणे नाही. माझ्यावर 70 हजार कोटींचे आरोप झाले होते, पण ज्यांनी आरोप केले आज त्यांच्यासोबतच मी बसतोय.” असं वक्तव्य करत त्यांनी केवळ आरोपांवरून राजकीय निष्कर्ष काढू नयेत, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यातील राजकारण तापले असून, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांवरून सुरू झालेला हा संघर्ष पुढील काळात आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.







