पुणे: व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रासाठी केंद्र सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. गैर-घरगुती पॅकेज्ड एलपीजीच्या पुरवठ्यावर लागू करण्यात आलेले सर्व क्षेत्रीय निर्बंध हटवण्यात आले असून, इराण-अमेरिका संघर्षानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे प्रभावित झालेला एलपीजी पुरवठा आता पूर्ववत करण्यात आला आहे.

सरकारच्या निर्णयानंतर संकटाच्या सुरुवातीला थांबवण्यात आलेला बल्क एलपीजीचा पुरवठाही पुन्हा सुरू करण्यात आला आहे. सध्या हा पुरवठा संकटापूर्वीच्या वापराच्या सुमारे 50 टक्क्यांपर्यंत खुला करण्यात आला असून, यामुळे उद्योग आणि व्यावसायिक ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

संकटाच्या काळात देशांतर्गत एलपीजी उत्पादन वाढवण्यासाठी सरकारने अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत आदेश जारी केला होता. त्यानुसार C3-C4 प्रवाहांचा वापर केवळ एलपीजी उत्पादनासाठी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे हे प्रवाह पेट्रोकेमिकल आणि इतर उद्योगांमधून वळवून एलपीजी निर्मितीसाठी वापरण्यात आले.
आता देशांतर्गत एलपीजी उत्पादनात सुधारणा झाल्याने आणि आयात केलेल्या एलपीजीचा साठा उपलब्ध होत असल्याने सरकारने C3-C4 प्रवाहांवरील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हे प्रवाह पुन्हा पेट्रोकेमिकल्स आणि इतर अत्यावश्यक औद्योगिक क्षेत्रांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
सरकारने स्पष्ट केले आहे की, या निर्णयाचा घरगुती एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यावर किंवा दरांवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही. हा निर्णय केवळ व्यावसायिक, औद्योगिक आणि पेट्रोकेमिकल क्षेत्राशी संबंधित असून सर्वसामान्य ग्राहकांच्या घरगुती गॅस पुरवठ्यात कोणताही बदल होणार नाही.






