पुणे: 1 जुलैपासून देशभरात अनेक महत्त्वाचे नियम बदलत असून त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारांवर आणि आर्थिक नियोजनावर होणार आहे. पासपोर्ट शुल्क, आधार अपडेट, क्रेडिट कार्ड सुविधा आणि इंधन विक्रीसंबंधी नवीन नियम लागू होणार असल्याने नागरिकांनी त्यांची माहिती आधीच जाणून घेणे आवश्यक आहे.

पासपोर्टसाठी जास्त शुल्क भरावे लागणार

नवीन पासपोर्ट काढणाऱ्या किंवा जुन्या पासपोर्टचे नूतनीकरण करणाऱ्या नागरिकांना 1 जुलैपासून अधिक शुल्क भरावे लागणार आहे. तब्बल 14 वर्षांनंतर सरकारने पासपोर्ट शुल्कात वाढ केली आहे. तसेच हरवलेला किंवा खराब झालेला पासपोर्ट पुन्हा काढण्यासाठीच्या शुल्कातही बदल करण्यात आला आहे.
आधारमध्ये ई-मेल अपडेट मोफत
1 जुलैपासून आधार मोबाईल ॲपद्वारे आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी अपडेट करण्याची सुविधा मोफत उपलब्ध होणार आहे. यासाठी यापूर्वी 75 रुपये शुल्क आकारले जात होते. मात्र ही सुविधा 31 डिसेंबर 2026 पर्यंतच मोफत उपलब्ध असणार आहे.
SBI क्रेडिट कार्डच्या रिवॉर्ड पॉइंट्समध्ये बदल
SBI कार्डने PhonePe SBI Credit Card Purple आणि PhonePe SBI Credit Card Select Black या कार्डांच्या रिवॉर्ड पॉइंट्सच्या नियमांमध्ये बदल केला आहे. आता दरमहा मिळणाऱ्या रिवॉर्ड पॉइंट्सवर मर्यादा असेल. तसेच काही व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार नाहीत.
HDFC क्रेडिट कार्डधारकांसाठी नवा नियम
HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे विमानतळावरील मोफत डोमेस्टिक लाउंज सुविधा मिळवण्यासाठी आता मागील तिमाहीत किमान 60,000 रुपयांचा खर्च करणे आवश्यक असेल. ही अट पूर्ण न केल्यास मोफत लाउंजचा लाभ मिळणार नाही.
पेट्रोल-डिझेल विक्रीवरील निर्बंध हटवले
केंद्र सरकारने सरकारी तेल कंपन्यांच्या पेट्रोल पंपांवरील पेट्रोल आणि डिझेल विक्रीवरील तात्पुरते निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जुलैपासून हा निर्णय देशभर लागू होणार आहे. इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर साठेबाजी रोखण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले होते.
31 जुलैपर्यंत ITR भरण्याची मुदत
दरम्यान, नोकरदार आणि करदात्यांसाठी 31 जुलै ही आयकर विवरणपत्र (ITR) भरण्याची अंतिम मुदत आहे. दंड आणि अन्य अडचणी टाळण्यासाठी वेळेत आयकर रिटर्न दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







