पुणे: पुण्यातील प्रसिद्ध रील स्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व जगताप याच्यावर डेक्कन परिसरात कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. सातारा येथील कास पठारावर झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसान पुण्यातील हल्ल्यात झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी रील स्टार माधवी कुंभारसह सात जणांना अटक केली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

अथर्व जगताप हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय असून, त्याचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स असल्याची माहिती आहे. तो प्रामुख्याने आलिशान गाड्या, कार स्टंट आणि लाइफस्टाइलशी संबंधित रील्स शेअर करण्यासाठी ओळखला जातो. त्याचे काही स्टंट व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

काही महिन्यांपूर्वी अथर्व जगताप कास पठार परिसरात कारमधून स्टंट करत असल्याचे सांगितले जाते. याचवेळी त्याच्या कारचा माधवी कुंभार आणि तिच्या साथीदारांच्या कारला कट लागल्याने दोन्ही गटांमध्ये वाद झाला होता. या किरकोळ कारणावरून त्यांच्यात जोरदार भांडण झाले.

कास पठारावरील वाद त्यावेळी मिटल्याचे वाटत असले तरी त्याचा राग कायम राहिल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यानंतर पुण्यातील डेक्कन परिसरात अथर्वला गाठून माधवी कुंभार आणि तिच्या साथीदारांनी त्याच्यावर कोयत्याने हल्ला केल्याचा आरोप आहे.
या हल्ल्यात अथर्व गंभीर जखमी झाला. घटनेनंतर डेक्कन पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत माधवी कुंभारसह सात जणांना अटक केली, तर एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, सोशल मीडियावरील वर्चस्व, जुन्या वादातून निर्माण झालेला राग आणि रील्सशी संबंधित वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास डेक्कन पोलीस करीत आहेत.






