पुणे: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात अटक झालेल्या सिया गोयलबाबत विविध चर्चा सुरू असताना तिच्या आई-वडिलांनी अनेक दाव्यांवर स्पष्टीकरण दिले आहे. सियाला दारूचे व्यसन होते किंवा तिचे लग्न घाईघाईत लावण्यात आले, या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचा दावा त्यांनी पोलिस चौकशीत केला आहे.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सियाचे वडील म्हणाले की, सियाचे लग्न ठरले तेव्हा ती 20 वर्षांची होती. मात्र तिचे लग्न लवकर ठरवण्यामागे कोणतेही वेगळे कारण नव्हते. केतन अग्रवालचे स्थळ चांगले असल्याने आणि त्याचे कुटुंब सुसंस्कृत असल्यामुळेच लग्नाचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

“केतन खूप चांगला मुलगा होता. त्याचे कुटुंबही चांगले होते. आमच्या मुलीला चांगले घर आणि चांगले सासर मिळत असल्यामुळे आम्ही लग्नाला होकार दिला. घाईघाईत लग्न ठरवण्यामागे दुसरे कोणतेही कारण नव्हते,” असे सियाच्या वडिलांनी स्पष्ट केले.
तसेच, सियाला दारूचे कोणतेही व्यसन नव्हते, असा दावाही त्यांनी केला. “ती काही कार्यक्रम किंवा पार्ट्यांना गेली असेल, पण तिने कधीही दारूचे व्यसन केले नाही,” असे त्यांनी सांगितले.
याशिवाय, सिया इतक्या कमी वयात अशा प्रकारच्या हत्येचा कट रचू शकते, यावरही त्यांनी विश्वास नसल्याचे म्हटले. “माझी मुलगी फक्त 20 वर्षांची होती. ती अशा प्रकारचा कट रचू शकत नाही,” असेही त्यांनी पोलिस चौकशीत सांगितल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, केतनला ट्रेकिंगची आवड होती, मात्र सियाला ट्रेकिंगची विशेष आवड नव्हती, अशी माहितीही तिच्या आई-वडिलांनी पोलिसांना दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.







