पुणे: मेट्रोला मिळणारा वाढता प्रतिसाद आणि प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महामेट्रोने गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारता वाढविण्याचे नियोजन केले आहे. गणेशोत्सवापासून गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी मेट्रो सेवा सुरू करण्याची तयारी महामेट्रोकडून करण्यात येत आहे. यासाठी गेल्या तीन दिवसांपासून चाचण्या घेण्यात येत असून, या चाचण्या यशस्वी होत असल्याची माहिती आहे. सध्या गर्दीच्या वेळेत दर सहा मिनिटांनी मेट्रो धावत आहे.

पुण्यात वनाझ-रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड-स्वारगेट या दोन मार्गिकांवर मेट्रो सेवा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून मेट्रोची दैनंदिन प्रवासीसंख्या सुमारे २ लाख ४० हजारांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत मेट्रो स्थानकांवर तसेच गाड्यांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. ही वाढती गर्दी लक्षात घेऊन मेट्रोच्या फेऱ्यांमधील अंतर कमी करण्याचा निर्णय महामेट्रोकडून घेण्यात आला आहे.

गणेशोत्सवापासून गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी मेट्रो उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. तर गर्दी नसलेल्या वेळेत नेहमीप्रमाणे दर दहा मिनिटांनी मेट्रो सेवा सुरू राहणार आहे. वारंवारता वाढल्याने प्रवाशांना मेट्रोसाठी जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. विशेषतः कार्यालयीन वेळेत नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

महामेट्रोकडे तीन डब्यांचे एकूण ३३ रेक आहेत. त्यापैकी सध्या ३० रेकचा नियमितपणे वापर केला जात आहे. दर पाच मिनिटांनी मेट्रो चालविण्यासाठी सर्व ३३ रेक सेवेत आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये वनाझ-रामवाडी मार्गावर १७, तर पिंपरी-चिंचवड-स्वारगेट मार्गावर १६ रेकचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळेत मेट्रोच्या फेऱ्यांची संख्या वाढविणे शक्य होणार आहे.
दर पाच मिनिटांनी मेट्रो चालविण्याच्या व्यवस्थेची गेल्या तीन दिवसांपासून चाचणी सुरू आहे. चाचण्यांचे परिणाम समाधानकारक असल्याने गणेशोत्सवापासून प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने महामेट्रोची तयारी सुरू आहे. प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत असल्याने भविष्यातील गर्दीचा विचार करून मेट्रो सेवा अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.






