पुणे: जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ऊर्जा (Fuel Shortage) पुरवठ्याबाबत महत्त्वाचा दिलासा दिला आहे. देशात कोळसा, पेट्रोल, डिझेल किंवा घरगुती गॅसचा तुटवडा भासणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. जनतेला कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सरकारने आधीच तयारी केली असून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

सध्या देशाकडे सुमारे 55 मेट्रिक टन कोळशाचा साठा उपलब्ध आहे. हा साठा पुढील 24 दिवस वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पुरेसा असल्याचे सांगण्यात आले आहे. देशातील सुमारे 70 टक्के वीज निर्मिती कोळशावर अवलंबून असल्याने हा साठा महत्त्वाचा मानला जात आहे. राज्यांना त्यांच्या गरजेनुसार कोळसा पुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, जेणेकरून कुठेही वीज खंडित होणार नाही.
घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकारने काही नवीन नियम लागू केले आहेत. औषधनिर्माण, कृषी, पोलाद आणि वस्त्रोद्योग यांसारख्या सुमारे 16 उद्योगांना आता त्यांच्या आधीच्या वापराच्या फक्त 70 टक्के गॅस देण्यात येणार आहे. त्यामुळे घरगुती वापरासाठी गॅस उपलब्ध राहील.
तसेच पेट्रोलियम मंत्रालयाने काळाबाजार रोखण्यासाठी कडक कारवाई सुरू केली आहे. देशभरात मोठ्या प्रमाणावर छापे टाकण्यात आले असून 56000 पेक्षा जास्त गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 51 वितरकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
सरकारने स्पष्ट केले आहे की, पुरवठा साखळी व्यवस्थित ठेवण्यासाठी सर्व पावले उचलली जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसून आवश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित सुरू राहणार आहे.







