Loni Kalbhor News: लोणी काळभोर, ता. 23 : तोडणीला आलेल्या 5 एकरहून अधिक क्षेत्रातील ऊसाला आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हेवली) ग्रामपंचायत हद्दीतील रायवाडी परिसरात मंगळवारी (ता.23) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या आगीत 6 शेतकऱ्यांचे 10 लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.

अशोक गेनबा गोते, गोविंद गोते, प्रभाकर अबू काळभोर, दत्तात्रय आबु काळभोर, भगवान लक्ष्मण काळभोर व सचिन भगवान काळभोर अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक 492 ते 493 मध्ये काळभोर यांची शेती आहे. या शेतात त्यांनी ऊसाची लागवड करण्यात आली होती. सोमवार पासून ऊसाची तोड केण्यासाठी कामगार आले होते. व एक ट्रक्टर ऊस सुद्धा गेला होता.
काही नागरिकांना सुरवातीला अशोक गोते यांच्या ऊसाला आग लागल्याचे पाहिले. त्यानंतर ती आग शेजारील शेतकऱ्यांच्या ऊसाला लागली. बघता बघता 5 एकरहून अधिक ऊस अर्ध्या तासाच्या आत जाळून खाक झाला. ऊसतोड कामगाराने सिगारेट अथवा बिडी पिल्यानंतर राहिलेला तुकडा टाकल्यामुळे आग लागल्याची माहिती मिळत आहे. शेतकरी लवकरच याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार देणार आहेत.
दरम्यान, या आगीत 6 शेतकऱ्यांचा तोडणीला आलेला 5 एकर ऊस जळून खाक झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे 10 लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत करावी. तर पोलीस प्रशासनाने आग लावणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.






