Baramati News: बारामती, ता. 20 : बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथे एका कंत्राटदारावर पाच अज्ञात इसमांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भरदिवसा झालेल्या या हल्ल्यात कंत्राटदाराला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, याप्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात पाच अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) गावच्या हद्दीतील बास्केट बाजारसमोरील मोकळ्या जागेत बुधवारी (ता. 18) सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास घडली. दिलीप धनसिंग जगताप (वय 52, व्यवसाय शेती व कंत्राटदार, रा. धुमाळवाडी, ता. बारामती, जि. पुणे, सध्या रा. प्लॉट नं. जी, लक्ष्मी नारायण नगर, कसबा-3, ता. बारामती) असे मारहाण झालेल्या कंत्राटदाराचे नाव आहे. याप्रकरणी जगताप यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिलीप जगताप हे शेतीसह कंत्राटदार म्हणून व्यवसाय करतात. बुधवारी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास ते माळेगाव बुद्रुक येथील बास्केट बाजारसमोरील मोकळ्या जागेत गेले होते. त्यावेळी 25 ते 30 वयोगटातील पाच अनोळखी तरुण तेथे आले. आरोपींनी संगनमत करून दिलीप जगताप यांना गाठले.
“आमचे पैसे का देत नाही?” असा जाब विचारत आरोपींनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर टोळक्याने त्यांना घेरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी दगड आणि लाकडी काठ्यांनी त्यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार करण्यात आले. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, हा हल्ला त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशानेच करण्यात आला होता.
दिलीप जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बारामती तालुका पोलिसांनी पाच अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 109(1) (खुनाचा प्रयत्न), 189(2), 190, 191(1), 191(2), 191(3), 3(5) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खटावकर करत आहेत.







