पुणे: राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना पुणे शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिल्या गेलेल्या काही उमेदवारींमुळे राजकीय वर्तुळात चर्चा आणि टीका सुरू झाली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबांतील चार सदस्यांना उमेदवारी देण्यात आल्याचा आरोप होत असून, त्यापैकी तीन महिला उमेदवार आहेत. विशेष म्हणजे यातील दोन उमेदवार कारागृहातूनच निवडणूक लढवणार आहेत. यावर आता अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे.

नाना पेठेतील आयुष कोमकर खून प्रकरणातील आरोपी आणि सध्या तुरुंगात असलेल्या सोनाली आंदेकर व लक्ष्मी आंदेकर, तसेच कुख्यात गुंड गजानन मारणे याची पत्नी जयश्री मारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत ‘एबी’ फॉर्म घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्यावर विरोधकांकडून तीव्र टीका होत आहे.
या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करताना अजित पवार म्हणाले, “आजपर्यंत झालेल्या सर्व निवडणुका बघा. आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात) यांच्याशी युती आहे. त्यांना काही जागा सोडण्यात आल्या आहेत. त्या जागांवर उमेदवार देण्याचा अधिकार संबंधित पक्षाचा असतो. याबाबत मी स्वतंत्र पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देणार आहे. माझी काम करण्याची पद्धत सर्वांनाच माहिती आहे.”
शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी आणि एबी फॉर्म वाटपाबाबत गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. “याच कारणामुळे डबल एबी फॉर्म, उमेदवारांमध्ये नाराजी अशा घटना घडल्या,” असे अजित पवार यांनी नमूद केले.
दरम्यान, या उमेदवारींवरून पुण्यातील महापालिका निवडणूक प्रचारात राजकीय आरोप-प्रत्यारोपांना अधिकच धार चढताना दिसत आहे.







