Pune Crime: न्हावरे: आंबळे (ता. शिरूर) येथे शेजारची जागा विकण्यास नकार दिल्याच्या कारणावरून मूळ जागा मालकावर लोखंडी रॉडने बेदम मारहाण (Brutally Attacked) करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची फिर्याद जखमी जागा मालक विलास नारायण बेंद्रे (वय ६०, रा. आंबळे, ता. शिरूर) यांनी शिरूर पोलिसात दिली आहे.
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबळे गावाच्या हद्दीत महेश विष्णु करे यांच्या बांधकाम सुरू असलेल्या स्लॅबवर ही घटना घडली. आरोपी संजय बाळासाहेब बेंद्रे (रा. आंबळे, ता. शिरूर) याने बांधकामासाठी जागा कमी पडत असल्याचे कारण सांगत फिर्यादी विलास बेंद्रे यांच्या मालकीच्या शेजारच्या जागेतील सुमारे ४ फूट रुंद व ६० फूट लांबीची जागा विकण्याची मागणी केली.
मात्र, “मला जागा विकायची नाही, हा विषय सोडून दे,” असे सांगून फिर्यादी विलास बेंद्रे जिन्याने खाली जाण्यासाठी निघाले असता, आरोपी संजय बेंद्रे याने तेथे पडलेला लोखंडी गज उचलून त्यांच्या पाठीवर, डोक्यावर व डाव्या पायावर बेदम मारहाण केली.
इतकेच नव्हे तर, “तुला स्लॅबच्या खाली टाकून देतो आणि संपवून टाकतो,” अशी जीवे मारण्याची धमकी देत आरोपीने लोखंडी रॉडने हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती शिरूर पोलिसांनी दिली आहे.






