पुणे: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान (Ajit Pawar Plane Crash) अपघातानंतर राज्यातील राजकारण तापलेले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. हा अपघात खरोखरच अपघात होता की त्यामागे घातपाताची शक्यता आहे, याबाबत सखोल चौकशी व्हावी, अशी त्यांची ठाम मागणी आहे. (Breaking News)

अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झाला. या घटनेने राज्यभर शोककळा पसरली. मात्र त्यानंतर काही दिवसांतच अपघातातील तांत्रिक बाबी, पायलटचा अनुभव, विमान कंपनीची पार्श्वभूमी आणि तपासातील विलंब यावरून प्रश्न उपस्थित होऊ लागले. रोहित पवार यांनी याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा हल्लाबोल केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “भावनेच्या भरात बोलले जात आहे” असा सूचक टोला लगावल्याच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी प्रतिउत्तर दिले. “जर मी भावनेतून बोलत असेन, तर मग मला ट्रोल करण्याची गरज काय? काही ट्रोलर्स आणि आयटी सेलशी संबंधित मंडळी माझ्याविरोधात मोहीम राबवत आहेत,” असा आरोप त्यांनी केला. समित ठक्कर यांच्यासारखे ट्रोलर पैशासाठी काम करत असल्याचा दावा करत त्यांनी सोशल मीडियावरील प्रचारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
रोहित पवार यांचा मुख्य रोख व्हीएसआर विमान कंपनीकडे होता. या कंपनीच्या पायलट सुमित कपूर यांच्याबाबत गंभीर आरोप करत त्यांनी सांगितले की कपूर यांना पूर्वी 3 ते 4 वर्षे निलंबित करण्यात आले होते आणि ते कमी पगारावर काम करत होते. यामुळे त्यांच्या पात्रतेबाबत शंका निर्माण होते, असे त्यांनी सूचित केले.
व्हीएसआर कंपनीचा मालक विजय सिंग यांचा मुलगा रोहित सिंग सध्या अमेरिकेतील मायामी येथे राहत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्याची पत्नी श्वेता सिंग हिच्यावरही पूर्वी एका जेट कंपनीतील गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे राजीनामा द्यावा लागल्याचा दावा त्यांनी केला. या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांच्यावरही त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली. मंत्री आणि कंपनी मालक यांच्यातील संबंधांमुळे तपासाची निष्पक्षता प्रश्नांकित होऊ शकते, असा त्यांचा सूर होता.
रोहित पवार यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. लेगेसी आणि लिएर जेट ही वेगवेगळ्या प्रकारची विमाने असून त्यासाठी स्वतंत्र परवाना आवश्यक असतो. मात्र संबंधित पायलट दोन्ही प्रकारची विमाने उडवत असल्याचे रेकॉर्ड आमच्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे बनावट कागदपत्रांचा संशय त्यांनी व्यक्त केला. तसेच व्हेनेझुएलाचा कॅप्टन कार्लोस नावाचा वैमानिक प्रवासी म्हणून भारतात येऊन प्रत्यक्षात कॉकपीटमध्ये जाऊन विमान चालवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
या सर्व आरोपांमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. अजित पवार हे राज्यातील प्रभावी नेते होते आणि त्यांचा मृत्यू केवळ वैयक्तिक हानी नसून मोठ्या राजकीय पोकळीचे कारण ठरला आहे. त्यामुळे या दुर्घटनेचा तपास पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने होणे अत्यावश्यक आहे. अपघातामागील तांत्रिक कारणे, मानवी चुका की अन्य काही घटक, हे स्पष्ट झाल्याशिवाय निर्माण झालेल्या शंका निवळणार नाहीत.
सध्या संबंधित कंपनी किंवा केंद्र सरकारकडून या आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र वाढत्या आरोप-प्रत्यारोपांमुळे या प्रकरणाची चौकशी अधिक काटेकोर आणि सार्वजनिक विश्वास जपणारी असणे आवश्यक ठरत आहे. राज्यातील जनतेला सत्य जाणून घेण्याची अपेक्षा आहे आणि पुढील काही दिवसांत या प्रकरणात नवे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.






