पुणे: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान (Ajit Pawar Plane Crash) अपघाताबाबत पहिल्यांदाच अधिकृत माहिती समोर आली असून विमान अपघात तपास ब्युरोने यासंदर्भात निवेदन जारी केले आहे. अपघातग्रस्त विमानातील दोन्ही रेकॉर्डर उच्च तापमानामुळे बाधित झाल्याचे ब्युरोने (Ajit Pawar Death) स्पष्ट केले आहे. विमान बराच वेळ आगीत जळत राहिल्याने रेकॉर्डरवरील माहितीवर परिणाम झाल्याचे सांगण्यात आले आहे. (Breaking News)

ब्युरोच्या माहितीनुसार, विमानात फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर असे दोन रेकॉर्डर होते. त्यापैकी L3 संभाषणाशी संबंधित काही डेटा मिळवण्यात यश आले आहे. मात्र कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरवर सखोल तांत्रिक तपास सुरू आहे. हा रेकॉर्डर हनीवेल कंपनीनिर्मित असून संबंधित देशातील अधिकृत प्रतिनिधींची मदत मागवण्यात आली आहे. तर्क-वितर्कांना बळी न पडता तपास प्रक्रियेवर विश्वास ठेवावा, असे आवाहन तपास ब्युरोकडून करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार पुरावेनिष्ठ तपास सुरू असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
ब्लॅक बॉक्स म्हणजे फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर यांचा समावेश असलेले उपकरण. उड्डाणादरम्यान विमानातील तांत्रिक माहिती आणि वैमानिकांमधील संभाषण यात नोंदवले जाते. साधारणतः हे उपकरण अत्यंत मजबूत बनावटीचे असते. अपघातानंतर तपासासाठी ते अत्यंत महत्त्वाचे ठरते. विमान वाहतूक महासंचालनालय आणि एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्वेस्टिगेशन ब्युरोच्या विशेष पथकांकडून त्याचा शोध घेतला जातो.
दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी तपासातील विलंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अपघाताला 20 दिवस उलटूनही तपासाचा वेग समाधानकारक नसल्याचे ते म्हणाले. ब्लॅक बॉक्स खराब झाल्याच्या माहितीकडे त्यांनी संशयाने पाहत काही दिवसांपूर्वी व्यक्त केलेली शक्यता खरी ठरत असल्याचा दावा केला.
28 जानेवारी रोजी सकाळी मुंबईहून बारामतीकडे जात असताना लँडिंगदरम्यान झालेल्या अपघातात अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनाने राज्यभर शोककळा पसरली होती.







