Ajit Pawar Death: पुणे : पुणे शहराचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण पुणे जिल्हा दुःखात बुडाला आहे. आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी पुणे जिल्हा ऑटो रिक्षा चालक मालक संघटना आणि पुण्यातील इतर सर्व रिक्षा संघटनांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. गुरुवारी २९ जानेवारी रोजी सकाळी ८:०० वाजल्यापासून ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत पुणे शहरातील रिक्षा सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. अजित पवार यांनी पुण्याच्या विकासासाठी दिलेले योगदान लक्षात घेऊन रिक्षा चालकांनी हा बंद पुकारला असून, या काळात एकही रिक्षा प्रवासी भाडे घेणार नाही.

अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी त्यांच्या मूळ गावी म्हणजेच बारामती येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अंत्यविधीपूर्वी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठान येथे ठेवण्यात येणार आहे. या ठिकाणी त्यांचे हजारो समर्थक, राजकीय नेते आणि कार्यकर्ते आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचा निरोप देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. ६६ वर्षांच्या अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपला एक वेगळा ठसा उमटवला होता. राज्याचे सर्वात जास्त काळ उपमुख्यमंत्री राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. त्यांनी वेगवेगळ्या काळात तब्बल ६ वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.
अजित पवार यांचा राजकीय प्रवास अत्यंत प्रभावी राहिला आहे. त्यांनी पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांसारख्या मुख्यमंत्र्यांसोबत काम केले होते. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बारामती विमानतळाजवळ त्यांचे विमान उतरत असताना हा भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह त्यांच्या सोबत असलेले वैयक्तिक सुरक्षा रक्षक, विमान परिचारिका आणि दोन वैमानिक अशा एकूण ५ जणांचा मृत्यू झाला.
५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते मुंबईहून बारामतीकडे निघाले होते. पुण्यात त्यांच्या दिवसभरात ४ सभा होणार होत्या, मात्र बारामती विमानतळावर धावपट्टीजवळ विमान कोसळल्याने ही मोठी दुर्घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून रिक्षा चालकांनी दिलेल्या या पाठिंब्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.






