Ajit Pawar accident : मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघाताला (Accident) दोन महिन्यांहून अधिक काळ उलटला असला तरी या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा अपघात नेमका कसा झाला, तो अपघात होता की घातपात, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणी तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू असून अद्याप कोणताही ठोस निष्कर्ष समोर आलेला नाही.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणाशी संबंधित एक नवा दावा करत खळबळ उडवली आहे. त्यांनी समता पतसंस्थेतील व्यवहारांबाबत संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, अपघाताच्या आधी आणि त्याच दिवशी या पतसंस्थेत व्यवहारांची संख्या अचानक वाढल्याचे दिसून आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 27 जानेवारी रोजी 17 व्यवहार, 28 जानेवारी रोजी 19 व्यवहार, तर त्यानंतरच्या 3 दिवसांत अनुक्रमे 10, 8 आणि 8 व्यवहार नोंदवले गेले. यापूर्वी या पतसंस्थेत महिन्याला अतिशय कमी व्यवहार होत असल्याचे सांगितले जाते. अचानक वाढलेल्या या व्यवहारांमुळे संशय निर्माण झाला आहे.
दमानिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या व्यवहारांमागे नेमके काय कारण आहे, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. त्यांनी या संदर्भातील सर्व माहिती एसआयटीकडे देऊन तपास करण्याची मागणी केली आहे. या व्यवहारांमधून पैशांची कोणती हालचाल झाली का, याचाही तपास होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रकरणात यापूर्वी काही संशयास्पद बाबी समोर आल्या होत्या. त्यामुळे या संपूर्ण घटनेभोवती गूढ कायम आहे. दरम्यान, पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना दमानिया भावनिक झाल्या.
या प्रकरणाचा तपास सुरू असून येत्या काळात अधिक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







