पुणे, ता. २५ : “गौरी वांजळे उर्फ गौरी बाजारे ही स्वतःला वकील म्हणून सांगत असली तरी ती प्रत्यक्षात बोगस असल्याचा आमचा आरोप आहे. मागील चार-पाच वर्षांत तिने अनेक नागरिकांना गंडा घातल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत,” काही लोकांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्यावर दबाव टाकणे, गुंगीचे औषध देऊन गैरफायदा घेणे आणि नंतर ब्लॅकमेल करणे अशा प्रकारांच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. तसेच निरपराध नागरिकांना खोट्या गुन्ह्यांत अडकवले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संबंधित महिलेला त्वरित अटक करण्यात यावी, अशी रणरागिणी विचार मंचाच्या अध्यक्षा उज्वला गौड यांनी केली आहे.

दरम्यान, पुणे शहरात चर्चेत आलेल्या या प्रकरणात विविध गुन्ह्यांच्या आरोपांनंतरही अद्याप अटक न झाल्याने तक्रारदारांनी कोथरूड पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, तातडीने कारवाईची मागणी जोर धरत आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, संबंधित महिलेविरुद्ध यापूर्वी गुन्हे दाखल झाले असून न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळल्याची माहिती समोर आली आहे. तरीदेखील ती अद्याप पोलिसांच्या ताब्यात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात वेगवेगळ्या नावांचा वापर करून सामान्य नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा आणि त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप काही तक्रारदारांनी केले आहेत. या प्रकरणात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी) गुन्हे दाखल असल्याचेही सांगण्यात येत आहे.
काही पीडितांनी संबंधित महिलेवर फसवणूक, धमकी व ब्लॅकमेलिंगचे आरोप करत पोलिसांकडे लेखी तक्रारी दिल्याचा दावा केला आहे. मात्र, अद्याप ठोस कारवाई न झाल्यामुळे संताप व्यक्त करत तिला तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, या सर्व आरोपांबाबत पोलिसांकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नसून, प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. संबंधित महिलेची बाजू समोर आलेली नसल्याने सत्यस्थिती तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.







