पुणे: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराच्या मध्य भागातील मद्य विक्री दुकाने 10 दिवस बंद ठेवण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता केवळ महत्त्वाच्या दिवसांसाठीच मद्य विक्रीवर बंदी राहणार आहे.

काय आहे सुधारित आदेश?

उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सुधारित आदेश जारी केले आहेत. त्यानुसार, संपूर्ण पुणे जिल्ह्यात गणेश चतुर्थी (August 27) आणि गौरी आगमन (31 ऑगस्ट), गौरी विसर्जन (2 सप्टेंबर) अनंत चतुर्दशी (September 6) या दिवशी मद्य विक्रीवर बंदी राहणार आहे.

याव्यतिरिक्त, मिरवणुकीच्या मार्गावरील दुकाने बंद ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत:
- विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत मिरवणुकीच्या मार्गावरील सर्व मद्य विक्री दुकाने बंद राहतील.
- ज्या भागात पाचव्या आणि सातव्या दिवशी गणपती विसर्जन होते, त्या भागातील मिरवणुकीच्या मार्गावरची दुकाने मिरवणुकीदरम्यान बंद राहणार आहे.
प्रशासनाचा मूळ निर्णय काय होता?
गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही गणेशोत्सव काळात खडक, विश्रामबाग आणि फरासखाना या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत मद्य विक्रीची दुकाने 10 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला होता. हा निर्णय भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन आणि कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी घेण्यात आला होता. या निर्णयाविरोधात शहरातील बार आणि रेस्टॉरंट चालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने 10 दिवसांच्या बंदीच्या आदेशाला स्थगिती दिली आहे, ज्यामुळे आता केवळ प्रमुख दिवसांसाठीच मद्य विक्री बंद राहणार आहे.







