पिंपरी: पिंपरी परिसरात सरकारी नोकरीच्या आमिषाने तब्बल 43 लाख 81 हजार 985 रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बेरोजगारी आणि सरकारी नोकरीबद्दल असलेली आकर्षणाची मानसिकता याचा गैरफायदा घेत आरोपीने तीन जणांना जाळ्यात ओढल्याचे उघड झाले आहे.

तक्रारीनुसार, आरोपीने फिर्यादीच्या घरी जाऊन ओळख निर्माण केली आणि समाजकल्याण विभागात वरिष्ठ निरीक्षक पदावर नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले. एवढेच नव्हे, तर फिर्यादीच्या पुतण्यासह आणखी एका व्यक्तीला नागपूर येथील तुरुंग प्रशासनात पोलिस भरती करून देतो, असेही सांगितले. सरकारी खात्यांमध्ये ओळखी असल्याचे भासवून त्याने विश्वास संपादन केला.
या आश्वासनांच्या बदल्यात आरोपीने वेळोवेळी मोठ्या रकमा उकळल्या. नोकरीची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत तो सतत वेळ काढत राहिला. काही वेळा कागदपत्रांची मागणी, तर काही वेळा अंतिम टप्पा सुरू असल्याचे कारण देत पैसे घेतले गेले. मात्र बराच काळ उलटल्यानंतरही कोणतीही नियुक्ती न झाल्याने फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांना संशय आला.
शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणात संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
या प्रकरणामुळे पुन्हा एकदा नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली असून, अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.







