पुणे: हिंजवडी परिसरात तडीपार गुंडांनी दहशत माजविल्याची घटना पुन्हा समोर आली आहे. हिंजवडी परिसर पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या सावटाखाली आला आहे. हॉटेलच्या भाड्यावरून झालेल्या किरकोळ वादाने मोठं रूप घेतलं आणि 4 ते 5 तडीपार गुंडांनी एका तरुणावर प्राणघातक हल्ला केला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाद वाढताच गुंडांनी एकत्र येऊन धारदार हत्यारांनी हल्ला चढवला. ज्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्वरित कारवाई करून दोन आरोपींना अटक केली असून, ते तडीपार गुंडांच्या टोळीतील असल्याचे स्पष्ट झाले आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असून, त्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे.

या घटनेने नागरिकांमध्ये संताप आणि असुरक्षिततेची भावना पसरली आहे. हॉटेलच्या भाड्यासाठी वाद झाला होता. या किरकोळ कारणावरून झालेल्या या हल्ल्याने कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. पोलिसांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. सध्या या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.







