पिंपरी-चिंचवड: बावधन परिसरातील महेंद्रकुमार बंजारे यांच्या खून प्रकरणाचा तपास पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पूर्ण केला असून, या प्रकरणातील एका संशयित आरोपीला दिल्लीमधून अटक करण्यात आली आहे. केवळ 2 हजारांच्या पैशांच्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे.

महेंद्रकुमार ओमप्रकाश बंजारे (वय 26, रा. लवळेवस्ती, मुळशी) हा तरुण बावधन परिसरातून बेपत्ता झाला होता. त्यानंतर 2 सप्टेंबर रोजी दुधाळे वस्ती भागातील एका तलावात त्याचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची अवस्था पाहता पोलिसांनी या घटनेचा गांभीर्याने तपास सुरू केला.

मृतदेह तलावात टाकण्यापूर्वी आरोपींनी महेंद्रकुमारचे हात टी-शर्टच्या सहाय्याने बांधले होते. तसेच त्याच्या पायांना मोठे दगड बांधून मृतदेह पाण्यात फेकण्यात आल्याचे तपासात समोर आले. पुरावे लपवण्याच्या उद्देशाने हा प्रकार करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे.

घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यासोबतच तांत्रिक माहितीच्या आधारे तपास पुढे नेण्यात आला. परिसरात मोलमजुरी करणाऱ्या काही कामगारांकडेही चौकशी करण्यात आली. या तपासातून गोपाल उर्फ राज साधोन बिस्वास (वय 20, मूळ पश्चिम बंगाल, सध्या गाझीपूर) याचे नाव पोलिसांच्या तपासात समोर आले.
गुन्ह्यानंतर आरोपी दिल्लीच्या दिशेने निघून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पथकाने दिल्ली गाठून आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या वादातून हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे.







