पुणे: काँग्रेसचा कार्यकर्ता आणि बांधकाम व्यावसायिक समीर हुसेन मनूर याचा खून प्रकरणात अटकेत असलेल्या सुफियान फैयाज चौरी याला मुंबई उच्च न्यायालयाने जमीन मंजूर केला आहे. चौरी याच्यावर कलम 302, 109, 115, 120 (बी) 34 सह भारतीय दंड विधान कलम ३ (२५) ४(२५), शस्त्र कायदा आणि कलम ३७(१) नुसार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

समीर हुसेन मनूर याचा खून केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी मेहबुब सैफान बलुरंगी (वय ३३, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा), निलेश सुनिल कुंभार (वय ३०, रा. लक्ष्मी कॉलनी, भेकराईनगर, हडपसर) आणि सुफियान फैयाज चौरी (वय १९, रा. लक्ष्मीनगर, पर्वती पायथा) यांना अटक केली. आर्थिक वादातून त्यांनी समीर ऊर्फ लालबादशाह हुसेन मनूर (वय ३२, रा. काळुबाईनगर, आंबेगाव बुद्रुक) याचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी समीर याचे वडिल हुसेनसाब महंमदसाब मनुर (वय ६७, रा. काळुबाईनगर, आंबेगाव बुद्रक) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
दरम्यान आरोपी सुफियान फैयाज चौरी याने जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर सात जानेवारीला सुनावणी पार पडली. यावेळी आरोपीचे वकील सना खान यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, कथित गुन्ह्याचा हेतू आरोपींना दिला जातो. मृताचे वडील सध्याचे गुन्ह्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. घटनेतील अर्जदार हा मृताच्या वडिलांना ओळखत नव्हता. तसेच अर्जदाराला अटक केल्यानंतर ओळख परेड आयोजित केली नाही. सध्याच्या अर्जदाराविरुद्धचा एकमेव दोषी पुरावा म्हणजे साक्षीदार आनंद सुर्वे यांच्या सहआरोपींची न्यायालयीन कबुली आणि पिस्तूलची कथित जप्ती आहे. तथापि, सध्याच्या अर्जदाराचा घटनेबाबत हेतू कारणीभूत नसल्यामुळे आणि अर्जदाराविरुद्ध इतर कोणताही गुन्हा यापूर्वी नसल्यामुळे सुफियान फैयाज चौरी याला जमीन मंजूर करण्यात यावा, असा युक्तिवाद अॅड. खान यांनी केला. मुंबई उच्च न्यायालयाने अॅड. खान यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत चौरी यास जामीन मंजूर केला. सदर जामीन अर्जावर अॅड. सना खान अॅड. विपुल दुशिंग यांनी युक्तिवाद केला. अॅड. प्रणय महाजन.यांनी कामकाज पाहिले.
नेमकं प्रकरण काय?
काँग्रेसचा कार्यकर्ता आणि बांधकाम व्यावसायिक समीर हा पूर्वी जनता वसाहत येथे राहायला होता. मेहबुब याची जनता वसाहतीत टपरी आहे. तो व्याजाने पैसे देत असे. तसेच भिशीही चालवित असे. समीरला मेहबुब याने संतोषनगर येथील प्लॉटच्या बांधकामाचे काम दिले होते. त्या व्यवहारापोटी मेहबुब याने पाच लाख रुपये दिले होते. त्यापैकी अडीच लाख रुपये समीरने परत केले होते. उरलेले अडीच लाख रुपये परत करावे, अशी मेहबुब समीरकडे वारंवार मागणी करीत होता. त्यावरुन दोघांमध्ये यापूर्वीही वादावादी झाली होती. या आर्थिक व्यवहारावरुन मेहबुब याने इतर तिघांशी संगनमत करुन कट रचला.
समीर हा सहा डिसेंबरला सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास बुलेटवरुन दत्तनगर येथील कार्यालयात निघाला होता. तो चहा पिण्यासाठी चंद्रभागा चौकात आला असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्याच्यावर ६ गोळ्या झाडल्या. डोक्यात गोळी लागल्याने समीर बुलेटवरच पडला. त्यात त्याचा जागीच मृत्यु झाला होता.







