पुणे: पुण्याला जागतिक पर्यटन नकाशावर स्थान मिळवून देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा पाऊल उचलण्यात आलं आहे. जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या एकात्मिक पर्यटन आराखड्याअंतर्गत पुढील वर्षी जानेवारी महिन्यात पुण्यात महिनाभर विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा आणि महोत्सवांचे आयोजन होणार आहे. या उपक्रमांमुळे पुण्यात देश-विदेशातील पर्यटकांची रेलचेल वाढणार असून, पर्यटनासोबतच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे.

क्रेडाई – पुणे मेट्रोच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. जितेंद्र डूडी यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “पुणे जिल्ह्यात ऐतिहासिक वारसा, गड-किल्ले, भौगोलिक विविधता आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरा यांचा विचार करून एकात्मिक पर्यटन आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये शासकीय खर्च टाळून खासगी क्षेत्राचा अधिकाधिक सहभाग घेतला जाणार आहे.”

याच कार्यक्रमात त्यांनी सांगितलं की, जानेवारी २०२६ मध्ये ‘पुणे ग्रँड सायकल चॅलेंज’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. ही स्पर्धा फ्रान्समधील ‘टूर डी फ्रान्स’ स्पर्धेच्या धर्तीवर राबवण्यात येईल. या स्पर्धेमध्ये जगभरातून सायकलपटू सहभागी होणार असून, त्यामुळे पुणे जिल्ह्यातील रस्त्यांचे डांबरीकरण, खड्डे दुरुस्ती आणि सौंदर्यीकरणाचे कामेही होणार आहेत.

याशिवाय, याच महिन्यात पॅराग्लायडिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि हॉट एअर बलून फेस्टिव्हल यासारख्या भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. “हा संपूर्ण महिना पुण्यासाठी पर्यटनाचा उत्सव ठरणार आहे. पर्यटकांची मोठी गर्दी झाल्यास हॉटेल, वाहन सेवा, स्थानिक व्यवसाय, पर्यटन मार्गदर्शक, आणि हस्तकला व्यवसायालाही मोठी चालना मिळेल,” असे डॉ. डूडी यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावरही गंभीर चिंता व्यक्त केली. “पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांची झपाट्याने होणारी वाढ ही प्रदूषणवाढीस जबाबदार ठरत आहे. विशेषतः ४० टक्के वायू प्रदूषण हे बांधकाम क्षेत्रामुळे होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी पर्यावरणपूरक उपाययोजना अमलात आणणे अत्यावश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.
“वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर पुण्यातही दिल्लीसारखी धुकट परिस्थिती उद्भवू शकते,” असा इशाराही त्यांनी दिला. तसेच, शहरात वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची टंचाईही मोठ्या प्रमाणावर जाणवत असून, जलस्रोतांचे संवर्धन हेदेखील आजच्या घडीचे मोठे आव्हान असल्याचे त्यांनी नमूद केले. पुणे शहराला आगामी काळात पर्यटनाच्या माध्यमातून जागतिक ओळख मिळवून देण्याचा प्रशासनाचा हा प्रयत्न स्तुत्य असून, सर्व संबंधित क्षेत्रांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतल्यास पुण्याचा चेहरामोहराच बदलू शकतो.







