Loni kalbhor : टपरीच्या आडून सुरु असलेल्या गांजाची विक्रीचा पर्दाफाश करण्यास लोणी काळभोर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी लोणी स्टेशन (ता. हवेली) परिसरातील फोर अव्हेन्यू सोसायटीसमोरील दळवीच्या टपरीवर मंगळवारी (ता.24) रात्री साडेनऊच्या सुमारास छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी 224 ग्रॅम गांजासह एकाला अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

अविनाश बाळासाहेब दळवी (वय 27, रा. खैरे वस्ती, लोणी स्टेशन) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार आण्णा दिलीप माने यांनी सरकारतर्फे लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खैरे वस्ती परिसरात टपरी मधून अंमली पदार्थाची विक्री केली जात आहे. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. तेव्हा टपरीजवळ अविनाश दळवी हा संशयित अवस्थेत उभा आढळून आला. पोलिसांनी त्याची अंगझडती व टपरीची तपासणी केली असता टपरीतील कप्प्यात पारदर्शक प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेल्या गांजाच्या 39 पुड्या आढळून आल्या.
इलेक्ट्रॉनिक वजनकाट्याने वजन केल्यावर हा गांजा पिशवीसह 224 ग्रॅम असल्याचे निष्पन्न झाले. तसेच संशयिताकडून एक मोबाईल फोनही जप्त करण्यात आला. अंमली पदार्थ व मोबाईल फोन असा 10 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी अविनाश दळवी याच्याविरुद्ध एनडीपीएस कायदा कलम 8(क), 20(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, पोलीस हवालदार अण्णा माने, संदीप जोगदंड, बापू वाघमोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.







