Daund Crime News : पुणे-सोलापूर महामार्गावरून पुण्याला जाण्यासाठी लिफ्ट मागणाऱ्या एका महिलेला बंदुकीचा धाक दाखवून निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली. मुकादमवाडी, कुरकुंभ ता, दौंड, जि.पुणे गावचे हद्दीत बुधवारी (ता. 25) घडली. याप्रकरणी दौंड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

अमोल साहेबराव काळे (रा. खडकी, ता. दौंड) असे बलात्कार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 32 वर्षीय महिलेने दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या बुधवारी (ता. 25) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आपल्या आईला भेटण्यासाठी पुण्याला जाण्यास निघाल्या होत्या. कुरकुंभ उड्डाणपुलाजवळील एका पेट्रोल पंपापाशी त्या वाहनाची वाट पाहत असताना, आरोपी अमोल काळे याने आपली काळ्या रंगाची कार (क्र. MH 42 BN 7755) त्यांच्याजवळ थांबवली. “मी पुण्याला चाललो आहे, तुम्हाला तिथे सोडतो,” असे सांगून त्याने महिलेला विश्वासात घेऊन गाडीत बसवले.
गाडी काही अंतर पुढे गेल्यावर आरोपीने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. पीडितेने आरडाओरडा करून गाडीतून उतरण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने आपल्या जवळील काळ्या रंगाची बंदूक काढून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. मुकादमवाडी गावच्या हद्दीत त्याने गाडी थांबवून पीडितेवर अत्याचार केला. विरोध केला असता त्याने महिलेला मारहाण केली आणि खांद्यावर चावा घेतला.
घटनेनंतर आरोपीने पीडितेला तिथेच सोडून पळ काढला. मात्र, पीडितेने प्रसंगावधान राखून आरोपीच्या गाडीचा नंबर लक्षात ठेवला आणि पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने शोधमोहीम राबवली आणि आरोपी अमोल काळे याला जेरबंद केले.
दरम्यान, आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(१), ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी) कलम ३(१), ३(२) आणि आर्म्स ॲक्ट कलम ३, २५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस करत आहेत.







