Dound : दौंड शहराच्या मध्यवस्तीत बेकायदेशीररीत्या पिस्तुल बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. हुतात्मा चौक परिसरात केलेल्या या कारवाईत एका 9 एमएम (9 mm) पिस्तुलसह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

इरफान उर्फ शेरखान शब्बीर खान (वय-22), व विशाल प्रकाश काटकर (वय-30), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर सोनू उर्फ बिल्ला उर्फ पद्माकर शांताराम ताडे (रा. कुंभारगल्ली, दौंड) असे फरार आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी असीफ नबीलाल शेख, सहायक फौजदार, स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा पुणे ग्रामीण यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. 26) रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दौंड शहरात गस्त घालत होते. यावेळी हुतात्मा चौक ते रेल्वे ग्राउंडकडे जाणाऱ्या रस्त्यावर संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या इरफान उर्फ शेरखान शब्बीर खान याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे 80 हजार रुपये किमतीचे एक स्टीलचे 9 एमएम पिस्तुल आणि रिकामी मॅगझीन मिळून आली.
अटक केलेला आरोपी इरफान याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने हे शस्त्र विशाल काटकर याने ठेवण्यासाठी दिल्याचे कबूल केले. पोलिसांनी तत्काळ विशाल काटकर यालाही ताब्यात घेतले. विशालने हे पिस्तुल सोनू उर्फ बिल्ला उर्फ पद्माकर शांताराम ताडे याने दिल्याचे सांगितले. या माहितीवरून पोलिसांनी गुन्ह्याची साखळी उघड केली आहे.
याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3(25) आणि भारतीय न्याय संहिता कलम 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक उगले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.







