Jejuri : जेजुरी गडाच्या पायथ्याशी असलेल्या नंदी चौकात भंडारा-खोबरे विक्रेत्याला मारहाण करून दुकानाची तोडफोड करणाऱ्या पाच आरोपींना जेजुरी पोलिसांनी अटक केली आहे. चपला ठेवण्यासारख्या किरकोळ कारणावरून झालेल्या या वादात दुकानदाराला बेदम मारहाण करण्यात आली होती. हि घटना 31 जानेवारीला घडली होती.

याप्रकरणी पोलिसांनी स्वप्नील जयेंद्र कांबळे (वय-33 , रा. दिघी, पुणे), प्रणय राजू पाटोळे वय-26, यश राजू पाटोळे (वय-19, रा. दोघेही काळेवाडी, सुधीर बाळू पाटोळे (वय -34 व सूरज बाळू पाटोळे (वय-25, रा. दोघेही मरकळ) यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेजुरी येथील नंदी चौकात महादेव वाघमारे यांचे भंडारा, खोबरे आणि पेढे विक्रीचे दुकान आहे. 31 जानेवारी रोजी काही भाविक या दुकानासमोर आले आणि त्यांनी तिथे चपला ठेवण्याचा हट्ट धरला. वाघमारे यांनी, “ज्या दुकानातून साहित्य घेतले तिथे चपला ठेवा, आमच्या दुकानासमोर ठेवू नका,” असे सांगितले. या साध्या कारणावरून वाद विकोपाला गेला आणि आरोपींनी जमाव जमवून वाघमारे यांना लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर दुकानातील साहित्य फेकून देऊन मोठी मोडतोड केली आणि आरोपी पसार झाले.
या घटनेनंतर महादेव वाघमारे यांनी 1 फेब्रुवारी रोजी जेजुरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध तक्रार दिली होती. दरम्यान, या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडिओचा आधार घेत पोलिसांनी दोन आरोपींचे फोटो व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रसारित केले होते. गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या पाचही आरोपींना शोधून काढले आणि त्यांच्या मुसक्या आवळल्या.
दरम्यान, सदर कारवाई जेजुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहायक पोलीस फौजदार नंदकुमार पिंगळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.







