Gas Shortage Impact : लग्नसराईचा हंगाम सुरू असतानाच गॅस सिलिंडरच्या टंचाईने केटरिंग व्यवसाय अडचणीत सापडला आहे. अचानक उद्भवलेल्या आंतरराष्ट्रीय तणाव आणि पुरवठा साखळीतील अडचणींमुळे व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा कमी झाला आहे. परिणामी, अनेक केटरर्सना आधीच घेतलेल्या लग्नाच्या ऑर्डर पूर्ण करताना मोठी कसरत करावी लागत आहे.

काही ठिकाणी केटरिंग व्यावसायिकांनी ग्राहकांना स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.“आम्ही तुमची ऑर्डर 6 महिन्यांपूर्वी घेतली होती. पण सध्या गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने 800 ते 900 पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था करणे कठीण आहे. जास्तीत जास्त 125 ते 150 पाहुण्यांपर्यंतच जेवण बनवता येईल. त्यापेक्षा जास्त पाहुणे असतील तर सिलिंडरची व्यवस्था तुम्हालाच करावी लागेल.”
लग्नाचे कार्यक्रम ठरल्यामुळे बहुतेक कुटुंबांनी आधीच मेन्यू आणि पाहुण्यांची संख्या निश्चित केलेली आहे. मात्र गॅसटंचाईमुळे केटरर्सना पदार्थांची संख्या कमी करणे किंवा पाहुण्यांची यादी कमी करण्याची विनंती करावी लागत आहे. अनेक समजूतदार ग्राहक परिस्थिती समजून घेत बदल स्वीकारत आहेत. काही ठिकाणी तर पाहुण्यांची संख्या एक तृतीयांशपर्यंत कमी करण्याचा निर्णयही घेतला जात आहे.
केटरिंग व्यवसायावर मोठी आर्थिक साखळी अवलंबून असते. या क्षेत्रात स्वयंपाकी, वेटर्स, भांडी पुरवठादार, डेकोरेशन कामगार, वाहतूक कर्मचारी अशा शेकडो लोकांचे रोजगार जोडलेले असतात. शिवाय, केटरिंगसाठी लागणारा बहुतांश कच्चा माल नाशवंत असल्याने ऑर्डर रद्द झाल्यास मोठे आर्थिक नुकसान होते.
केटरिंग व्यावसायिक सचिन देवधर सांगतात, “करोनानंतर आता गॅसटंचाई ही आमच्यासाठी दुसरी मोठी आपत्ती ठरली आहे. ऑर्डर कमी झाल्या तर कर्मचारी कमी करावे लागतील. सरकारने किमान दररोज 1 किंवा 2 व्यावसायिक सिलिंडर नियमित उपलब्ध करून द्यावेत.”
दरम्यान, पुण्यातील कोथरूड येथील आशीर्वाद डायनिंग हॉलचे संचालक हेमंत राजवाडे यांनीही परिस्थितीची गंभीरता सांगितली. सिलिंडर उपलब्ध नसल्याने सायंकाळच्या वेळेत डायनिंग हॉल बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी सांगितले. सध्या बाहेरील केटरिंग ऑर्डरही तात्पुरत्या थांबवण्यात आल्या आहेत.
गॅस पुरवठा सुरळीत झाला नाही, तर लग्नसमारंभ, हॉटेल आणि केटरिंग उद्योगावर याचा मोठा परिणाम होण्याची भीती व्यावसायिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर पुरवठा सुरळीत करण्याची मागणी उद्योगातून होत आहे.







