हिंजवडी: संततधार पावसामुळे हिंजवडी आयटी पार्कमध्ये पाणी साचल्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. हिंजवडी आयटी पार्क जलमय झाल्यानंतर या परिसरातील पायाभूत सुविधांमधील त्रुटी चव्हाट्यावर अळ्या असून, प्रशासनाच्या तयारीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आयटी पार्कच्या रस्त्यांवर अक्षरशः ‘नद्या’ अवतरल्याचे वृत्त आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाले होते.

परिसरात पाणी साचल्यामुळे हिंजवडी येथील अपुऱ्या पाणी निचरा (ड्रेनेज) व्यवस्थेची कमतरता स्पष्ट झाली आहे. पावसाचे पाणी वाहून नेण्यास ही व्यवस्था सक्षम नसल्याचे दिसून आले आहे. गटारांमध्ये गाळ आणि कचरा अडकल्याने पाणी रस्त्यावर साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या गंभीर परिस्थितीनंतर एमआयडीसी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.
दरम्यान, परिसरातील तुंबलेले नाले, गटारे व पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या साफ करण्यात आल्या. तसेच अनेक ठिकाणी पाण्याला वाट करून देण्यात आली. दरम्यान, स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असली तरी येत्या काळात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागरिकांनी ही केवळ तात्पुरत्या उपाययोजना असून, यावर कायमस्वरूपी आणि ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.








