Hadpasar : हडपसर परिसरात कबुतर चोरीच्या संशयावरून एका 19 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रुपेश धनराज शिंदे (वय 19, रा. बोराटे वस्ती, मोशी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुपेश शिंदे आणि त्याचा मित्र अजय टिंगरे हे मंगळवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास हडपसर परिसरातून दुचाकीवरून निघाले होते. हडपसरमधील शंकर मठ परिसरातील एका कबुतराच्या ढाबळीजवळ ते काही वेळ थांबले होते. यावेळी तेथील पाळीव कुत्रे भुंकू लागल्याने परिसरात राहणाऱ्या पाच जणांना जाग आली.
चोर आल्याच्या संशयावरून या पाच जणांनी रुपेश आणि अजय यांना हटकले. घाबरलेले दोघेही तरुण तेथून पळू लागले, मात्र टोळक्याने त्यांचा पाठलाग सुरू केला. पळत असताना रुपेशचा पाय घसरला आणि तो रस्त्यावर पडला. यावेळी आरोपींनी त्याला घेरले आणि क्रिकेटच्या बॅटने तसेच लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. या हल्ल्यात रुपेशच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी रुपेशला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, जखमा गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. आपल्या तरुण मुलाचा अशा प्रकारे अंत झाल्याने वडील धनराज शिंदे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वानवडी पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.







