Pune News: पुणे : उन्हाळी सुट्ट्यांचा कालावधी सुरू होताच गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे एसटी विभागाने 15 एप्रिल ते 15 जून या कालावधीत 450 अतिरिक्त बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या बस पुण्यातून कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, मुंबई, छत्रपती संभाजीनगर तसेच कोकणातील विविध मार्गांवर धावणार आहेत.

उन्हाळ्यात शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या लागल्यामुळे अनेक कुटुंबे गावाकडे किंवा पर्यटनासाठी बाहेर पडतात. त्यामुळे रेल्वे आणि खासगी वाहनांबरोबरच एसटी बसस्थानकांवरही मोठी गर्दी होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाने अतिरिक्त बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन या प्रमुख बसस्थानकांवरून अतिरिक्त फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. विशेषतः दादर, ठाणे, बोरिवली, पंढरपूर, लातूर, धुळे आणि अकोला या मार्गांवर जादा बस सोडण्यात येतील. त्यामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित प्रवास करता येणार आहे.
दरम्यान, प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत राज्य परिवहन महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चालक आणि वाहक यांच्या ड्युटीपूर्वी अल्कोटेस्ट चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. या चाचणीत पात्र ठरल्यानंतरच चालकांना बस चालवण्याची परवानगी दिली जाणार आहे.
पुणे विभागात सध्या 882 चालक, 1052 वाहक आणि 912 बस कार्यरत आहेत. दररोज या सर्वांची तपासणी केली जाणार असून, त्याची नोंद डिजिटल पद्धतीने ठेवली जाणार आहे. मद्यप्राशन करून ड्युटीवर आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
या निर्णयामुळे प्रवाशांना सुरक्षित, सोयीस्कर आणि परवडणाऱ्या दरात प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.







