Crime : मुळशी तालुक्यातील उरवडे परिसरात अवैध जुगार अड्ड्यांवर पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईने खळबळ उडाली आहे. उरवडे ते मुकाईवाडी रस्त्यावरील एका बंगल्याच्या पत्रा शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत पोलिसांनी 30 जणांना ताब्यात घेतलं. या कारवाईत सुमारे 63 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई केवळ एका अड्ड्यापुरती मर्यादित नाही, तर मुळशी परिसरात वाढत चाललेल्या जुगाराच्या जाळ्याची तीव्रता दर्शवणारी आहे. गोपनीय माहितीनंतर पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकला. ‘एस.पी.एफ. व्येंकीज’ कंपनीलगत असलेल्या लाल रंगाच्या बंगल्यात मोठ्या प्रमाणावर पत्त्यांचा जुगार सुरू असल्याचं समोर आलं. छाप्यात पत्त्यांचे संच, रोकड आणि इतर साहित्य हस्तगत करण्यात आलं.
या अड्ड्यावर पकडले गेलेले लोक केवळ स्थानिक नव्हते. पिंपरी-चिंचवड, कोथरूड, वारजे, हडपसर, पाषाण यांसारख्या शहरातील विविध भागांतून लोक येथे खेळण्यासाठी येत असल्याचं स्पष्ट झालं. विशेष म्हणजे, या गटात 1-2 नव्हे तर अनेक व्यावसायिक आणि नोकरदार वर्गातील व्यक्तींचा समावेश असल्याने हा प्रकार अधिक गंभीर मानला जात आहे. या प्रकरणात क्लबचालकासह सर्व 30 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या 8 दिवसांत मुळशीत ही दुसरी मोठी कारवाई आहे. यापूर्वी मुगावडे-चाले मार्गावरील ‘निवांत व्हिला’ येथे पोलिसांनी 40 जणांना पकडलं होतं. सलग 2 कारवायांमुळे या भागात जुगार अड्ड्यांचं संघटित जाळं तयार होत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.







