Crime : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याच्या मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर एका चार वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या पाशवी अत्याचारामुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. हातावर पोट असलेल्या एका ऊसतोड कामगार कुटुंबाच्या विश्वासाचा फायदा घेत, एका नराधमाने या चिमुरडीचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे.

नेमकी घटना काय?
मध्य प्रदेशातील एक कुटुंब ऊसतोडणीचा हंगाम संपवून आपल्या गावी परतण्यासाठी १६ फेब्रुवारीच्या रात्री पुणे स्थानकावर आले होते. सोबत चार लहान मुले आणि प्रवासाचा थकवा होता. मध्य प्रदेशला जाणारी गाडी सकाळी असल्याने हे कुटुंब प्लॅटफॉर्म क्रमांक २-३ वरच मुक्कामाला थांबले. मध्यरात्रीच्या सुमारास जेव्हा आई-वडील गाढ झोपेत होते, तेव्हा शेजारीच बसलेल्या एका नराधमाने संधी साधली. त्याने ४ वर्षांच्या बालिकेला चॉकलेट आणि बिस्किटाचे आमिष दाखवून प्लॅटफॉर्मच्या निर्जन आणि अंधाऱ्या कोपऱ्यात नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला.
या घटनेमागचे सर्वात भयावह कारण म्हणजे ‘परिचित असण्याचा आभास’. आरोपी हा परप्रांतीय असून तो कुटुंबाच्या शेजारीच बसला होता. प्राथमिक ओळख झाल्यामुळे आई-वडिलांचा त्याच्यावर विश्वास बसला. परंतु, याच विश्वासाचा फायदा घेत त्याने या चिमुरडीला पालकांपासून अवघ्या काही अंतरावर असताना उचलले. मुलीच्या ओरडण्यामुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आणि पोलिसांनी तत्काळ नराधमाला बेड्या ठोकल्या.






