Crime News : पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली आहे. मांजरी परिसरात भरदिवसा, गर्दीच्या बाजारात झालेल्या दरोड्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये चांगलीच भीती पसरली आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील शेवाळवाडी येथील ‘महावीर ज्वेलर्स’ या सराफा दुकानावर चार सशस्त्र तरुणांनी धाड टाकत लाखो रुपयांचे दागिने लुटले. (Crime News)

ही घटना शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. त्या वेळी दुकानात मालक एकटेच होते. ही संधी साधत चार तरुण हातात लांब, धारदार कोयते घेऊन थेट दुकानात घुसले. मालक एकटे असल्याचं लक्षात येताच दरोडेखोरांनी त्यांना कोयत्याचा धाक दाखवला आणि “आरडाओरडा केलास तर जीव घेऊ” अशी धमकी दिली.
हातात जीवघेणी हत्यारे असल्यामुळे घाबरलेल्या सराफ मालकांना काहीच प्रतिकार करता आला नाही. अवघ्या काही मिनिटांत दरोडेखोरांनी दुकानातील सोन्याचे दागिने पिशव्यांमध्ये भरले आणि दुचाकीवरून वेगाने पसार झाले.
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भरवस्तीत, दिवसाढवळ्या झालेल्या या धाडसी दरोड्यामुळे पोलिसांच्या गस्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. घटनेची माहिती मिळताच मांजरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सध्या अज्ञात चार दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं कामाला लागली आहेत.







